अल्पवयीन मुलांवर होणा-या लैंगिक शोषणप्रकरणी नीलम गो-हेंचं सीएमना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 10:18 PM2017-08-08T22:18:11+5:302017-08-08T23:33:17+5:30
गेल्या काही दिवसांत राज्यभरात अल्पवयीन मुलांवर विविध व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहे.
मुंबई, दि. 8 - गेल्या काही दिवसांत राज्यभरात अल्पवयीन मुलांवर विविध व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे राज्यातील सामाजिक सुरक्षा आणि एकंदर वातावरण भयावह होऊ पाहतंय. बहुतांशी घटनांमध्ये जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी, शाळेतील कर्मचारी यांनीच अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने पालकवर्गही धास्तावला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतनं अल्पवयीन मुलांवर होणा-या लैंगिक शोषणाचं वृत्तांकन प्रसिद्ध केलं होतं.
या वृत्ताची दखल घेत आमदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. सन 2016 मध्ये 223 बलात्काराच्या घटना घडल्या आणि यापैकी 199 घटनांचा तपास झाला तर 2017 मध्ये 193 बलात्काराच्या घटनांपैकी 180 घटना उघडकीस आल्या होत्या. 2016 मध्ये 565 लहान मुला–मुलींचे अपहरण करण्यात आले तर त्यातील 265 घटना पोलिसांकडे नोंद झाल्या. 2017 मध्ये 662 मुलींचे अपहरण झाले असून त्यातील 401 घटनांचा पोलीस तपास करण्यात आला. जुलै 2017च्या पहिल्या पंधरवड्यातच 18 मुलींवर लैंगिक अत्याचार तर 60 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. या अपहरण झालेल्या मुला – मुलीना लैंगिक अत्याचारासोबातच अनैसर्गिक कृत्ये, निर्यात चोरी, विवाह, उंटांच्या शर्यती, भीक मागणे, खंडणी, गुलामगिरी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात वापर करून घेतले जाते. अशा घटनांचे लोण राज्याच्या इतर भागातही पसरत आहे.
पुण्यात बाललैंगिक अत्याचाराच्या जून 2017 मध्ये 33 घटना घडल्या असून ओळखीच्या व्यक्ती, शेजारी, स्कूल बसचालक, काही ठिकाणी तर पालकदेखील यात दोषी असल्याचे आढळले आहे. केवळ पुरुषच नाही तर महिलादेखील बालके आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत अंधेरी, दिंडोशी, आरे वसाहत पवई अशा विविध भागांतही अशा घटना घडल्या आहेत. पवईच्या मुलांनी तर या प्रकारामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांतही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, अमरावतीमध्ये 25 जुलै 2017 रोजी एक बालक आणि पाच मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजाळा येथे आई वडिलांना धमकी देऊन दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे एका 65 वर्षीय नातेवाईकाने शालेय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याने त्याने आत्महत्या केली आहे. कोल्हापूरमध्ये अंगणवाडीतील चार वर्षांच्या बालिकेवर शिक्षकानेच अतिप्रसंग केला आहे. दारूच्या नशेत स्वतःच्या मुलीवर बापाने अत्याचार केला असून दुस-या घटनेत आठ वर्षाच्या एका बालिकेवर 66 वर्षाच्या वृद्धाने अत्याचार केले आहेत. एका 55 वर्षीय शिक्षकानेही विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याने तो आता अटकेत आहे.
मराठवाडा विभागात उस्मानाबाद परिसरात अशी घटना घडली असता पालकांनी बदनामी टाळण्यासाठी पोलिसात तक्रार दिलेली नाही. लातूरमध्ये नुकतीच घडलेली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्न लावून दिल्याची घटना, उदगीर, निलंगा व लातूर शहरातून तीन मुले अचानकपणे गायब झाली आहेत. बीड जिल्ह्यात एका वीटभट्टीवरील मुलीवर तेथील कामगारांनी अत्याचार केल्याने या मुलीने आत्महत्या केली. तिच्या शवविच्छेदन अहवालात ती गरोदर असल्याचे आढळले. हिंगोली जिल्ह्यात या प्रकारचे चार गुन्हे घडले आहेत तर परभणी जिल्ह्यात नानलपेठ, पाथरी, मानवत आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नंदुरबारमध्ये देखील असे दोन गुन्हे घडले आहेत.