मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस Mumbai Police दलात बदल्यांचं रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागानं सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय CBI चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. Devendra Fadnavis to meet central home secretary about racket in Mumbai police transfer तसेच, परमबीर सिंग टेलरबॉम्बप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चुप्पीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
फडणवीस यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर पोलीस दलातील अनागोंदीवरुन जोरदार आरोप केले. "पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अनेक सबळ पुरावे गोळा केले होते आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. पण त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही?", असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, मुख्यंत्री एक शब्दही बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे, त्यांना गोपनियतेचा कुठला कायदा लागू होतो का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर, उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंत्र्यांच्या चुप्पीवर सवाल उपस्थित केले. त्यासाठी, कुठलाही गोपनीयतेचा कायदा लागू होत नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते जरुर पत्रकार परिषदा घेऊ शकतात. पण, ही पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी होती. मुख्यमंत्री एक शब्दही यावर बोलत नाहीत आणि पवार साहेबांना त्याठिकाणी बोलावं लागतंय. विशेष म्हणजे शरद पवार जे बोलत आहेत, ते चुकीचं दिसतंय, असेही फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुप्पीवरच सवाल उपस्थित केले आहेत.
केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
"पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी आणि काही राजकारण्यांचीही नावं आहेत. त्यामुळे या चौकशी अहवालातील तब्बल ६ जीबीचे कॉल रेकॉर्ड्स पुरावे म्हणून सादरही करण्यात आले होते. पण ते अतिशय संवेदनशील असल्यानं सार्वजनिक करणं योग्य होणार नाही. या संदर्भात मी आता केंद्रीय गृहसचिवांची भेटीची वेळ मागितली आहे आणि त्यानुसार आज दिल्लीत मी त्यांना भेटून हे सर्व पुरावे त्यांच्यासमोर सादर करणार आहे", असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील गृहसचिवांकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
पवारांइतकं माझं इंग्रजी चांगलं नाही
"नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे", असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारानं इंग्रजी असा उल्लेख केल्यानंतर "त्यांच्याइतकं माझं इंग्रजी चांगलं नाही", असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या पवारांना खोचक टोला लगावला.