Join us

जीवाची बाजी लावून तिरंगा वाचवणाऱ्या 'त्या' बहाद्दराचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 7:30 PM

आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत-पळत चढून जात तिरंगा सुखरूप आणला होता खाली

मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता शिपाई कुणाल जाधव यांनी इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणला होता. दरम्यान, या शौर्याबद्दल कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सह्यादी अतिथीगृहात छोटेखानी सत्कार केला.

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काल ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला व शाल, श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत केले. याप्रसंगी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

कुणाल जाधव हे जीएसटी भवनला शिपाई म्हणून कार्यरत असून, आग लागली तेव्हा ते तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी ते जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत-पळत चढून गेले व तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या शौर्याचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेअशोक चव्हाण