मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन येथील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी होऊन अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच येथील वाहतुकीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गांवर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाºया अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अन्नदान करणाऱ्यांसाठी व्यवस्थावाहनातून अन्नदान करणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पास घेतलेल्यांना शिवाजी पार्क, केळुस्कर उत्तर गेट क्रमांक सहा येथून प्रवेश दिला जाईल. माहीम येथून येणारे दिलीप गुप्ते मार्गाचा वापर करू शकतात. आपत्कालीन स्थितीत वाहनांसाठी सिद्धिविनायक मंदिर ते कापड बाजार ही मार्गिका मोकळी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेच्या विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. इंदू मिल येथील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.