Join us  

'...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:10 AM

हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 

मुंबई- भाजपाचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शिवसेना आणि भाजपमध्ये कोण किती हिंदुत्ववादी आहे, हे सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

आम्ही भाजपाला सोडलं आहे. हिंदुस्त्वाला सोडलं नाही. सत्ता असो वा नसो आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही.' ते म्हणाले, भाजपाने स्वतः काही केले नाही. म्हणून दुसरा किती वाईट आहे. हे ते दाखून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांचं नाव घेत देखील भाजपावर हल्लाबोल केला. मोहन भागवत यांनी लिहिलं आहे की, सावकार मुस्लिमांचे शत्रू नव्हते. तर त्यांनी उर्दूत गजल लिहिल्या आहेत. संघ मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये शाखा सुरू करणार असल्याची बातमी वाचत त्यांनी भाजपाला प्रश्न केला आहे की, आता संघाला मुस्लिम संघ म्हणायचं का? की राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं? मोहन भागवत यांना खान म्हणायचं का?, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

एकहाती सत्तेवर नंतर बोलू- उद्धव ठाकरे

लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर बाकीचे आपण गांभीर्याने घेत नाही. ही भूमिका आता चालणार नाही. एकहाती सत्तेवर नंतर बोलू. पक्ष वाढवत असताना एकदा जरी जिंकलेली जागा असेल, तरी तिची माहिती माझ्याकडे आली पाहिजे. युती भाजपने तोडली; पण, त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसराष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपा