Lokmat Exclusive: शरद पवार जेव्हा येतात, तेव्हा मी काय पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसत नाही- उद्धव ठाकरे
By मुकेश चव्हाण | Published: November 28, 2020 10:43 AM2020-11-28T10:43:32+5:302020-11-28T10:47:04+5:30
भाजपा आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. त्यांच्याच पक्षातले जुनेजाणते नेते त्यांनी बाजूला ठेवले आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केली.
मुंबई: महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची एकदम वेगळी भूमिका राष्ट्रवादी पक्ष अजिबात घेणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी. पण तीही त्यांना शक्य होणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगावला. आम्हाला हरवता येत नाही ना मग, बदनाम करा... या वृत्तीने भाजप वागत आहे. याच पंचवीस वर्षाच्या सहकाऱ्याने आमचा विश्वासघात केला, हे एकमेव आणि कधीही न विसरता येणारे शल्य आहे. भाजपा आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. त्यांच्याच पक्षातले जुनेजाणते नेते त्यांनी बाजूला ठेवले आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केली.
मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याने वागतात आणि निर्णय घेतात, असा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपवरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार आणि आमच्या परिवाराचे संबंध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासून आहेत. राजकीय संबंध देखील आहेत. शरद पवार जेव्हा येतात तेव्हा मी काही पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसल्यासारखा बसत नाही. ते अनुभवाचे बोल सांगतात. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांमध्ये त्यांनी काय केले होते हे सांगतात. या परिस्थितीत काय केले पाहिजे हे सांगतात. त्यामुळे त्याचा फायदाच होतो, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
भाजपाने मुख्यमंत्रीपदी तुम्हीच रहा, आपण सरकार बनवू असे सांगितले, तर ते तुम्ही मान्य करणार का, या प्रश्नावर आता ती वेळ निघून गेल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आज आम्ही यांच्यासाठी वाईट झालो, या आधी आम्ही वाईट नव्हतो का? प्रत्येकवेळी मीच का टपल्या मारुन घेऊ...? दिवस सगळयांचे सारखे नसतात. काळ बरोबर निर्णय घेत असतो. आता त्या बोलण्याला काही अर्थ नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
भाजपा आणि इतर राज्यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी व त्याचे नेतृत्व आपण करावे असे आपल्याला वाटते का? आपल्याला दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा आहे का?
- आज तरी माझा तसा कोणता विचार नाही. मी दिवसाढवळ्या अशी स्वप्न पहात नाही. मी पुन्हा येईन असेही मी कधी म्हणत नाही, न म्हणताच मी इथे देखील आलोय. काम करणे हा माझा स्वभाव आहे. जे आवाक्यात आहे ते करावे व आपली वाटचाल चालू ठेवावी यावर माझा विश्वास आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षात समन्वय नाही, एकवाक्यता नाही असे बोलले जात आहे. त्याचे कसे खंडन कराल?
- आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. तीघे भीन्न विचारांचे आहेत असे म्हणत असाल तरीही ‘राज्याचे हीत’ हा आमच्यातला समान विचार आहे. विश्वासघात हा आमच्या तीघांचा गूण नाही. त्यामुळे आमचे व्यवस्थीत चालले आहे. तीघांमध्ये उत्तम समन्वय आहे. प्रत्येकाने आग्रही रहाणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यात ते आहे.
केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे अडतीस हजार कोटी रुपये देत नाही, असे आपण सांगितले आहे. अन्य राज्यांची देखील ती अवस्था असेल तर तुम्ही भाजपेतर राज्यांनी एकत्रित येऊन काही भूमिका घेणार का?
- मी यावर आज तरी काही स्पष्ट बोलणार नाही. मात्र ज्या राज्यांना केंद्राकडून हक्काचे पैसे मिळाले नसतील त्या राज्यांनी याविषयी आपले मत मांडणे गरजेचे आहे. जर त्यांना पैसे मिळाले असतील तर त्यांनी ते कसे मिळवले हे आम्हाला सांगावे. आम्ही देखील तो मार्ग स्वीकारू. मात्र त्यांना पैसे मिळाले नसतील तर त्यांनी तसे सांगावे व त्यावर भूमिका घ्यावी.