Join us  

'माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...'; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 5:06 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केलं. 

मुंबई- कोरोना काळात माझ्या गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या  प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकलो, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केलं. 

कोरोनाच्या काळात काळात आपणसर्वांनी जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर जाऊन, रस्त्यांवर उतरून काम केलं त्यामुळे कोरोनाच्या संकटावर आपल्याला मात करता आली. कोरोना पुन्हा डोके वर काढातांना दिसतोय त्यामुळे काळजी घेणं आज ही आवश्यक आहे. आम्ही राजकारणी  स्वप्नं दाखवणारी माणसं आहोत पण ही स्वप्नं सत्यात आणणारी आणि जमिनीवर मजबूतपणे उभं राहून काम करणारी माणसं आपण सर्वजण आहात, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याची काही उदाहरणे मी नक्की सांगू शकेल. ज्यामध्ये मी कोरोनाचा उल्लेख केला आहेच परंतू शासनाने सत्तेवर आल्या आल्या जो कर्जमुक्तीचा निर्णय घेतला तो अतिशय बिनबोभाटपणे अंमलात आणला गेला हे देखील एक उदाहरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझा उल्लेख जेव्हा 'लाडका मुख्यमंत्री' असा केला जातो तेव्हा त्या श्रेयाचे खरे धनी प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी असता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

तसेच आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले परंतू शेतकरी कायमस्वरूपी आपल्या पायावर पुन्हा उभा कसा राहील याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तो प्रयत्न आपण करत आहोत. विकेल ते पिकेल अभियानाची अंमलबजावणी असेल किंवा शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय असतील, या सर्व कामात प्रशासकीय सुलभता आली ती तुम्हा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी