सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:55+5:302021-06-02T04:06:55+5:30

आपली लेखणी समाजहितासाठी झिजविणारा आणि पत्रकारितेतील नव्या पिढीला बातमीदारीची ओळख करून देणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ...

Chief Minister Uddhav Thackeray has lost a fearless journalist who reads public questions | सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

आपली लेखणी समाजहितासाठी झिजविणारा आणि पत्रकारितेतील नव्या पिढीला बातमीदारीची ओळख करून देणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात असे म्हटले आहे की, राधाकृष्ण नार्वेकर यांनी माथाडी कामगार, गिरणी कामगार यांच्या प्रश्नांसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांबाबत आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडली. त्यांचे ‘मनातील माणसे’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक प्रतिभाशाली ललित लेखकाचे दर्शन घडविते. साधी-सोपी भाषा आणि थेट वाचकांच्या मनाला स्पर्शणारी शैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते. एखाद्याला हवा असलेला संदर्भ सहजतेने उपलब्ध करून देणाऱ्या नार्वेकरांनी संपादक म्हणून अग्रलेख, प्रासंगिक स्फुट, स्तंभलेख, व्यक्तिचित्र, स्मरणचित्र, राजकारण, भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर विपुल लेखन केले. त्यांनी ज्येष्ठांचे, सेवानिवृत्तांचे आयुष्य आनंददायी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे.

* महाराष्ट्र एका अभ्यासू पत्रकार व सुहृद व्यक्तिमत्त्वाला मुकला - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ पत्रकार, दै. ‘सकाळ’चे माजी संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ वाटचालीत नार्वेकर यांनी विविध विषयांवर जनसामान्यांचे प्रबोधन केले; तसेच आपल्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या पिढ्या घडविल्या. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजवरच्या विविध महत्त्वपूर्ण घटनांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका अभ्यासू पत्रकार व सुहृद व्यक्तिमत्वाला मुकला आहे, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

* लढाऊ पत्रकार, कृतिशील संपादक आज काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या व्यथांशी समरस झालेला, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा लढाऊ पत्रकार, कृतिशील संपादक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. नार्वेकर यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी वृत्तसमूहांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. दैनिक मुंबई सकाळशी मात्र त्यांचे वेगळे नाते होते. दैनिक मुंबई सकाळचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. तीच त्यांची ओळख होती. मुंबईच्या आणि मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या हा त्यांचा अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा विषय होता. निर्भीड, निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पत्रकारांच्या अनेक पिढ्या आज विविध माध्यमांतून आपले योगदान देत आहेत. राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन मराठी पत्रकारिता, मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

.................................

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray has lost a fearless journalist who reads public questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.