मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. लता मंगेशकर यांच्या निधानानंतर आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबईतील दादरमध्ये शिवाजी पार्क स्मशानभूमित त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.