नवाब मलिकांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:56 AM2021-11-11T07:56:51+5:302021-11-11T08:00:23+5:30
बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या एका वीज कंत्राट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. या संदर्भात राऊत यांच्याकडे एक व्यक्तिगत तक्रार आली होती. एक काम केल्याचे दोनवेळा दाखविण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात निधी लाटला, अशी ही तक्रार आहे. पायाभूत सुविधा टप्पा दोन अंतर्गत हे काम करण्यात आले होते.
फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागात झालेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश राऊत यांनी दिल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले होते. मात्र, ऊर्जा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी त्याचा इन्कार केला. हे प्रकरण केवळ नाशिकमधील एका कामाशी संबंधित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.