मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद असून ते एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. सुमारे १९९७ पासून त्यांनी जंगलात जाऊन फोटोग्राफीला सुरुवात केली. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्या उद्धव ठाकरे-द टायगर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या दोन पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित राहून आपल्या सुमारे २० मिनिटांच्या भाषणात त्यांना आलेले फोटोग्राफीतील थरारक रोमांचकारी अनुभव त्यांनी सांगितले. या दोन पुस्तकांचे प्रकाशन शिवसेना नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात झाले. यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन पुस्तकांचे प्रकाशन इंकिंग इनोव्हेशनच्या आनंद लिमये यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जंगलात फोटोग्राफी करताना डॉ. दीपक सावंत हे अनेकवेळा माझ्याबरोबर होते. सगळा जंगल प्रवास आणि घटना तुम्ही लेखणीतून साकार केल्याने या घटना ताज्या वाटतात. कॅमेरा कसा धरायचा, फोटो कसा क्लिक करायचा ही कला डॉ. सावंत यांच्यात आहे. तुम्ही कॅमेऱ्यातून जंगल टिपले आणि तुम्ही ते लेखणीत शब्दबद्ध केले. या पुस्तकातून तुमच्यातील एक साहित्यिक दिसला. तुम्ही उत्तम साहित्याची निर्मिती केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
एकदा जंगलात उघड्या जीपमधून फोटोग्राफी करत वाघीण पुढे पुढे येत होती. एक वाघीण अगदी जीपला घासून पुढे गेली. मी मात्र घाबरलो होतो. मात्र, त्या वाघिणीने मागे वळूनसुद्धा बघितले नाही. कारण टायगर उद्धव ठाकरे होते, असे सांगताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर तेसुद्धा तुम्हाला त्रास देत नाहीत. प्रत्येकाची देहबोली ओळखता आली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
डॉ. दीपक सावंत हे एक चांगले डॉक्टर असून कोणतेही काम करताना झोकून देऊन काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असून त्यांची आता लेखक म्हणून नवीन ओळख दिसून आली आहे. तुमचे पुस्तक वाचल्यावर भावले असून तुम्ही एक कसलेल्या लेखकप्रमाणे आपले म्हणणे मांडले असून मोठे साहित्यिक म्हणून तुमचा गौरव होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री.