मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी करण्यात आला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय उद्या किंवा परवा घेऊ असे सांगितले. तसेच, दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जधारकांसाठी कर्ज माफीची नवीन योजना आणणार असल्याचेही म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार आहेत. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना लागू करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. आधीच्या सरकारपेक्षा 50 हजारांनी ही रक्कम वाढविली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी झाला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आज खातेवाटप जाहीर झालेले नाही.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून एका मोठ्या वर्गाला या कर्जमाफीचा काहीही लाभ होणार नाही, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाजपाने आजच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.