Join us

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय पेचावर झाली चर्चा?

By प्रशांत माने | Published: May 01, 2020 9:01 AM

मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्या येत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रश्नामुळे सध्या राज्यात राजकीय पेच विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा पेच निर्माण झालाराज्यपालांनी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रश्नामुळे सध्या राज्यात राजकीय पेच उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्या येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पुढच्या काही दिवसात सहा महिने पूर्ण होतील. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  अद्याप विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य होता आलेले नाही. त्यातच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा पेच निर्माण झाला आहे.

 अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारकडून उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस करण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यातच राज्यपालांनी राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी काल निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांची आज झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीशिवसेनामहाराष्ट्र सरकार