मुंबई: महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उध्दव ठाकरे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, कोल्हापूरच्या विकासाला आपल्या लेखणी आणि वाणीने आकार देण्यात दीक्षित यांचा मोठा वाटा होता. साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान करवीरवासिय कायमच स्मरणात ठेवतील. राज्यातील अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. त्यांचे विवेचन वस्तुनिष्ठ व तर्कावर असायचे. प्रश्न धसास लागेपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून प्रयत्न केले. नवे लेखक आणि कवि यांना सकाळच्या माध्यमातून त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक लेखक कवी घडले.
बार्शीसारख्या गावात जन्म झाला.परंतु पत्रकारितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला. पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या अनेक होतकरू युवकांसाठी दिवंगत दीक्षित मार्गदर्शक राहिले. त्यांनी निर्भीड आणि स्वतंत्र बाण्याचे पत्रकार घडविले. हे पत्रकारिता आणि राज्यासाठी मोठे संचित असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.