Join us

समुद्रात बुडणाऱ्या बोटीतील 88 जणांना वाचविणाऱ्या पोलिसांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 4:29 PM

आज सकाळी ‘गेट-वे-ऑफ इंडिया’ ते मांडवा जेट्टी या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अजिंठा या प्रवाशी बोटीला अपघात झाला.

मुंबई - मांडवा (अलिबाग) जवळ समुद्रात बुडणाऱ्या बोटींतील  महिला व बालकांसह 88 जणांना वाचविणाऱ्या रायगड पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील जवानांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडसाचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. या जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेले बचाव कार्य आणि त्यासाठीच्या प्रसंगावधानासाठी मुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षा दलाच्या या कार्यक्षमतेला दाद दिली आहे.

आज सकाळी ‘गेट-वे-ऑफ इंडिया’ ते मांडवा जेट्टी या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अजिंठा या प्रवाशी बोटीला अपघात झाला. मांडवा जेट्टीपासून एक किलोमीटर अंतरावर असताना अचानक बोट बुडू लागल्याने महिला व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांनी मदतीसाठी हाका देणे सुरु केले. या मदतीच्या हाकेला गस्तीवर असलेल्या रायगड जिल्हा पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील  सद्गगुरू कृपा बोटीवरील पोलीसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. या दलातील प्रशांत घरत (पो. ना बक्कल न. 891) यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशांची मदत घेऊन बुडणाऱ्या प्रवाशी बोटींतील पुरुष, महिला व बालके अशा 88 जणांना गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. सुटका झालेल्या सर्व प्रवाशांना जेट्टीवर पोहचताच पोलिस दलाच्या कार्यतत्पर मदतीसाठी आभार मानले. रायगड पोलिस दलातील सागरी सुरक्षा दलातील कर्मचारी श्री. घरत आणि सहकाऱ्यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअलिबागअपघातपोलिस