राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. सुरुवातीला ते नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याची माहिती समोर आली नव्हती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे त्यांच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात पोहोचले. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असून ते फक्त रुटीन चेकअप म्हणून रुग्णालयात उपस्थित राहिले होते.
विशेष म्हणजे याआधी रुटीन चेकअपसाठी उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात जात होते. पण उद्धव ठाकरे सध्या वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी असल्यानं जवळच्याच रुग्णालयात जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि सकाळीच ते स्वत: ड्रायव्हिंग करत एचएन रुग्णालयात पोहोचले. याआधी याच रुग्णालयात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांच्यावर उपचार झाले होते. तासाभराचं रुटीन चेकअप झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयातून रवाना झाले. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.