जितेंद्र आव्हाड यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश; २४ तासांत काढला ताेडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:37 AM2021-06-24T07:37:28+5:302021-06-24T07:37:40+5:30
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
मुंबई : म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अवघ्या २४ तासांत आव्हाडांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले आहे.
कॅन्सर रुग्णांना म्हाडाची घरे देण्यास स्थानिकांचा विरोध असल्याची तक्रार शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, शरद पवारांच्या उपस्थितीतील निर्णय तडकाफडकी रद्द केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले.
दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात वितुष्ट आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सोयीसाठी बॉम्बे डाइंगमध्ये १०० सदनिका आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे स्वतः आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
‘मला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले व त्याच परिसरात दुसरी जागा शोधून तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली. बॉम्बे डाइंगमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय अवघ्या १५ मिनिटांत घेण्यात आला’, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.