मुंबई : सहार टी २ टर्मिनलसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी १० वाजता अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दर्शनी भागात पुनर्स्थापित करण्यात आला आहे. गुरुवारी तिथीनुसार भारतीय कामगार सेनेने या शिवजयंतीचे आयोजन केले होते. या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष संजय कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी विलेपार्ले (पूर्व) येथील मुख्य हायवेजवळील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. महाराजांच्या मागे निर्माण करण्यात येणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृती बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान, सहार गावकरी शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन टीमचे सदस्य व नवपाडा रहिवासी सहार टी २ टर्मिनल मुंबई विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.‘जय शिवाजी, जय भवानी’ घोषणा दिल्या. जीव्हीके कंपनीच्या अधिकारी यांनी प्रत्येक गुरुवारी हायवे आणि टी-२ टर्मिनल्ससमोरील महाराजांच्या या दोन्ही पुतळ्यांवर पुष्पहार अर्पण करण्याची तसेच येथे संग्रहालय उभे करण्याची मागणी केली.
तसेच टी -२ टर्मिनल्ससमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि जीव्हीके व्यवस्थापनाचे आभार मानले. दरम्यान, विलेपार्ले पूर्व हायवे आणि टी-२ टर्मिनलसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्यांच्या डोक्यावर छत्र नाही.