मुंबई- १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता सभेपूर्वी विविध पोस्टरही शिवसेनेकडून जारी करण्यात येत आहे. आज देखील शिवसेनेकडून एक पोस्टर ट्विट करण्यात आलं आहे.
घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, असं म्हणत सभेला यायलाच पाहिजे, असं ट्विटमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.
महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपानेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे. याआधी देखील सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन भाष्य करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे भाषणातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहे. मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा म्हणू, असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्य, केंद्र सरकार, सतत वाढणारी महागाई, केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील आगामी निवडणुका, असे विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करतील, असं सांगण्यात येत आहे.