श्रीरामाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येस  जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:30 AM2020-01-26T05:30:58+5:302020-01-26T05:35:02+5:30

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच अयोध्या भेट असेल.

Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya on March 7 | श्रीरामाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येस  जाणार

श्रीरामाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येस  जाणार

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी सहकुटुंब जाणार आहेत. पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच अयोध्या भेट असेल. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते जात आहेत. सेनेचे सर्व खासदार व काही मंत्री त्यांच्यासह जातील. सेनेचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाला मुरड घातल्याचा आरोप होत असताना हिंदुत्व सोडलेले नाही हे दाखविण्याचा एक भाग म्हणूनही या अयोध्या भेटीकडे बघितले जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेबाबत बोलताना, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, ईडीने मध्यंतरी राज ठाकरे यांची चौकशी केली, त्यामुळे तर त्यांनी आधीची भूमिका बदलली नाही ना, असा सवाल सावंत यांनी केला.

राज यांच्या भूमिकेवर शिवसेनेकडून टीका
राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनात घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेच्या मुखपत्रातून शनिवारी टीका करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी कॉपी वाचून दाखवली गेली. वीर सावरकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्याचा खेळ नाही. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, असा सल्ला मुखपत्रात राज यांना देण्यात आला आहे.

शिवसेनेने हिरवा गॉगल घातला : मनसेची टीका
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या टीकेनंतर, ज्यांच्या डोळ्यावर हिरवा गॉगल त्यांनी आम्हाला हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल शिकवू नये, असा टोला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला हाणला. बाळासाहेबांचे विचार स्वीकारणे शिवसेनेचे काम नाही. ते त्यांनी सत्तेसाठी सोडले आहेत, असे देशपांडे म्हणाले.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya on March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.