मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया, मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सरकारची कोंडी केली. दरम्यान, विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे - महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. ही इडी आहे की घरगडी आहे, तेच कळत नाही- ईडीच्या कारवाईला मी घाबरत नाही, मला तुरुंगात टाका, मात्र जिथे कृष्णजन्म झाला होता, तो तुरुंग शोधून त्या तुरुंगात टाका- माझ्या नातेवाईकांची बदनामा करू नका, हिंमत असेल तर समोरून लढा, ठाकरे सरकारला बदनाम करणे ही विकृती - मी कृष्ण नाही, मात्र तुम्हालाही सांगता आलं पाहिजे की, तुम्ही कंस नाही आहात. कंसाच्या भूमिकेत जाऊ नका- सत्तेसाठी धाडी टाकू नका. मी तुमच्यासोबत येतो, मला टाका तुरुंगात - सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तुम्ही मलिक, देशमुखांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसला असता- ज्यांनी अफजल गुरूच्या फाशीला विरोध केला होता, त्यांच्यासोबत भाजपा सत्तेत होता, भाजपा सत्तेत असलेलं तेव्हाचं सरकार हे अफजलचं सरकार होतं का?- मुदस्सीर लांबेसोबत भाजपाच्या नेत्यांचे फोटो, लांबेच्या निवडीच्या पत्रावर विनोद तावडेंनी हिरव्या शाईच्या पेनाने सही केलेली आहे. - सध्या होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असे आरोप करू नका. निराधार आरोपांच्या आधारे राजीनाम्याची मागणी करणे अयोग्य आहे.
मुख्यमंत्र्यांचा विधानसभेतून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल, प्रत्येक आरोपाला दिलं असं प्रत्युत्तर, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:17 PM