Join us

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 1:49 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन डॉक्टरांच्या कार्यचं कौतुक करताना कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय

मुंबई - शासकीय तसेच खासगी रूग्णालयांतील डॉक्टर गेले चार महिने कोरोनाशी अविरत लढत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमामुळे या लढ्याला यश येत असल्याचे राज्यातील वाढत्या कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. यापूर्वी आपल्या आरोग्य यंत्रणेने अशा अनेक संकटांचा सामना केला आहे. पण यंदाचा लढा हा फक्त आरोग्यविषयक नसून समाजाच्या मानसिकतेशीही जोडल्याचे निरीक्षण डॉक्टर नोंदवत आहे. कोरोनासोबत लढताना रूग्णांना धीर देणाऱ्या, सर्वस्वी त्यांचा आधार बनलेल्या या जीवनदूतांना ‘डॉक्टर्स डे’ निमित्त नेटीझन्सकडून सलाम करण्यात येत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन डॉक्टरांच्या कार्यचं कौतुक करताना कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसेच, तुम्हाला सहकार्य करण्याचं वचन देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासोबत, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पत्र लिहून सर्वच डॉक्टरांना डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही देव आहात, अशा शब्दात आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या कार्याचं कौतुक करत, त्यांना सलाम केला आहे. 

तसा, तुमचा कुठला एक दिवस असू नये, कारण देवाचा कुठला एक दिवस असतो का? तो आपणाला दररोजच हवा असतो. सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण जीवाची बाजी लावून लढता आहात. आज देशात सगळीकडे मंदिरे बंद असताना, तेथील देव कुठे आहे तर तो तुमच्यात. नागरिकांना आता डॉक्टरांमध्ये देव दिसत असल्याची सार्वजनिक भावना आहे. आज, हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, ते केवळ आपल्यामुळेच, म्हणूनच आपले मानावे तेवढे आभार कमीच, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे. आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर्स डे दिनानिमित्त भावनिक पत्र लिहून राज्यातील सर्वच डॉक्टर्संचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :मुंबईडॉक्टरउद्धव ठाकरेराजेश टोपे