मुंबई : मुख्यमंत्री पद वा जागावाटपावरुन दोन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याने बोलायचे नाही, असे ठरले असताना दोन्ही पक्षांचे विविध नेते रोजच्या रोज मुख्यमंत्री पदावरून वक्तव्ये करीत आहेत. शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे सुरू केल्याने युतीतील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचे ठरल्याची बातमी शिवसेनेकडूनच पद्धतशीरपणे पसरविण्यात आल्याची चर्चा असली तरी तसे काहीही ठरले नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. आदित्य यांनीही आपली तशी इच्छा असल्याचे बोलून दाखविले आहे. ‘मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ या शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून परतण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस तर दुसरीकडे आदित्य ठाकरे असे मुख्यमंत्री पदाचे दोन दावेदार तयार झाले आहेत. सत्ताकारणाचा अनुभव नसलेले आदित्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर आल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
दबावाला भीक नकोयुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक दावेदार आम्हीच आहोत, असे असताना शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणत असलेल्या दबावाला भिक घालू नका, अशी तीव्र भावना भाजपचे पदाधिकारी, आमदार, मंत्री हे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यक्त करीत आहेत.