'राम कदमांच्या कार्यक्रमास हजर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 08:26 AM2018-09-05T08:26:53+5:302018-09-05T08:29:03+5:30
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे.
मुंबई - भाजपा आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांचा विरोधकांकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच याप्रकरणी केवळ राम कदम यांनीच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेची माफी मागावी, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही राम कदमांचा समाचार घेतला.
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल, तर तिला पळवून आणण्यास मदत करू, असं वादग्रस्त विधान भाजपा आमदार राम कदम यांनी केलं आहे. मुलाला मुलगी पसंत असेल, त्याच्या आई-वडिलांनादेखील ती मुलगी पसंत असेल, तर आपण त्या मुलीला पळवून आणू, असं राम कदम यांनी म्हटलं. घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात राम कदम यांनी हे बेजबाबदार आणि जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणजे, मी माझ्या विधानावर ठाम असल्याचंही राम कदम यांनी म्हटलं आहे.
राम कदमांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन त्यांच्यावर टीका केली. 'घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि महिला भगिनींचा अवमान करणारे आहे. त्यांनीच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे, असे मुंडेंनी म्हटले आहे.
घाटकोपर चे @BJP4Maharashtra चे आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि महिला भगिनींचा अवमान करणारे आहे. त्यांनीच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या @Dev_Fadnavis यांनीही समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 4, 2018
तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीवरचे भाष्य करणाऱ्या राम कदमांवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीवरचे भाष्य करणाऱ्या @ramkadam यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहात @CMOMaharashtra ? या राज्यात रोडरोमियोंच्या त्रासामुळे मुली रस्त्यावर उतरायला देखील घाबरत असताना तुमचे आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात, हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते ?
— Supriya Sule (@supriya_sule) September 4, 2018