Join us  

मुख्यमंत्री करणार पालिका रुग्णालयांचे ‘ऑपरेशन’; स्वतः भेट देऊन करणार पाहणी; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

By संतोष आंधळे | Published: May 18, 2023 12:23 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील पाच रुग्णालये म्हणजे बजबजपुरीचे मूर्तिमंत उदाहरण. कमालीची अस्वच्छता, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची होणारी अबाळ, ...

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील पाच रुग्णालये म्हणजे बजबजपुरीचे मूर्तिमंत उदाहरण. कमालीची अस्वच्छता, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांची होणारी अबाळ, रुग्णालय प्रशासनाचा अजागळपणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांच्या पाचवीला पुजलेली दुरवस्था या सर्व गोष्टी या रुग्णालयांमध्ये सर्रास दिसतात. मात्र, सध्या या सर्व रुग्णालयांत स्वच्छता मोहीम सुरू आहे. याला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काही दिवसांत स्वत: या रुग्णालयांची पाहणी करणार आहेत, आरोग्य क्षेत्रातील कामांत मुख्यमंत्री शिंदे कायम अग्रेसर असतात. 

रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी विशेष मदत कक्षही स्थापन केला आहे. रुग्णालय स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री कायम आग्रही असतात. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कळव्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी तेथील निवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तेथील अधिष्ठात्यांना निलंबित केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित भेटीने खडबडून जाग्या झालेल्या पाचही रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. 

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री रुग्णालयाला भेट देणार असल्याचा संदेश सर्व अधिष्ठात्यांना मिळाला आहे. त्यामुळे सध्या रुग्णालय परिसरातील डेब्रिज, नको असणारे सामान, भंगार काढण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सर्व ठिकाणची स्वच्छता कशा पद्धतीने राखली जाईल, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. इमारतींमध्ये जमलेली जळमटेही काढून टाकली जात आहेत.  

औषधसाठा पुरेसा ठेवण्यात भर महापालिकेच्या रुग्णालयांत काही दिवसांपासून औषध टंचाईच्या अनेक बातम्या झळकल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयांत सर्व पद्धतीची औषधे रुग्णांना उपलब्ध होतील, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. निवासी डॉक्टर आयत्यावेळी काही तक्रार करणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने भेट देऊन जर आरोग्य यंत्रणा कामाला लागत असेल, तर त्यांनी शक्य असेल, त्यावेळी सरप्राईज भेटी देऊन या रुग्णालयांची पाहणी केल्यास सर्वच रुग्णालये कायमस्वरूपी स्वच्छ राहतील.  - एक वरिष्ठ डॉक्टर 

टॅग्स :एकनाथ शिंदेहॉस्पिटलमुंबईशिवसेना