मुख्यमंत्र्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागणार; १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरुन सोमय्यांनी घेतली राज्यपालांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:53 PM2022-02-23T12:53:53+5:302022-02-23T12:55:05+5:30
राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई-
राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई येथील १९ बंगल्यांवरुन सुरू असलेल्या वादाप्रकरणी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यात समोर येत असून यासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि तशा सूचना राज्य सरकारला देण्यात याव्यात अशी विनंती करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. ते राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाबाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
राज्यातील सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पना
राज्यात जे काही घोटाळे घडले आहेत किंवा घडत आहेत त्याची संपूर्ण कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. कोर्लईतील १९ बंगल्यांच्याबाबत जर नेमकी माहिती समोर येत नसेल आणि मुख्यमंत्र्यांचं नाव त्यात आलं आहे, तर ते गप्प का? त्यांना राज्याच्या जनतेला उत्तर द्यावच लागेल, असं किरीट सोमय्या म्हणाले.
नवाब मलिकांचे कारस्थान आता हळूहळू जनतेला कळू लागलंय
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांचे कारस्थान आता हळूहळू जनतेला कळू लागलं आहे. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले.