मुंबई : राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ४३८४ किमीचा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र परिषदेत सांगितले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरु होणाºया या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान असेल. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ आॅगस्ट रोजी सुरु होईल. त्यात १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे.
या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हे आहेत. उद्घाटनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यांचं नक्की काय ठरलंय?शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असणे काही गैर नाही. पण प्रत्येक महत्वाकांक्षा व्यवहारात येतेच असे नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत असेल, पण मला ते माहीत नाही. ठरले असेल तर त्यावेळी बघू, असेही ते म्हणाले. काँग्रेसकडे ९०० जणांचे अर्ज आले असेल तर चांगली बाब आहे. आणखी अर्ज यायला हवेत म्हणजे लढायला मजा येईल, असेही त्यांनी सांगितले.