मुख्यमंत्री 15 तास काम करतात, काँग्रेसच्या मंत्र्याकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:34 PM2020-09-02T19:34:48+5:302020-09-02T19:49:04+5:30
बाळासाहेब थोरात यांना विदर्भातील पूरस्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना, राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
मुंबई - राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरु आहे, तो याआधी कधीच नव्हता असा आरोपही दरेकर यांनी केला होता. आता, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.
बाळासाहेब थोरात यांना विदर्भातील पूरस्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना, राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. आम्ही तिथं पूरस्थितीच्या ठिकाणी जाणं योग्य नसतं. प्रशासन काम करत आहे, मुख्यमंत्रीही दररोज 15 तास काम करतात. सर्वच स्थितीवर ते काम करत असून परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन आढावा घेतात, असेही थोरात यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नसल्याची टीका भाजपा नेत्यांकडून वारंवार होत आहे.
एक होतकरू पत्रकार आज दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे आणि आता त्यांचे निधन झाल्यानंतर चौकशी करून काय उपयोग? त्यातून काय साध्य होणार? पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर व आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग? pic.twitter.com/EYG6AO23zj
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 2, 2020
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
"सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री"