Join us

..तर मुख्यमंत्रीही झालो नसतो

By admin | Published: March 01, 2015 12:25 AM

निवडणुका जिंकत गेलो. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा प्रवास मलाच आश्चर्यचकित करणारा आहे.

.मुंबई : कॉलेजनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला खरा; मात्र त्यानंतरच्या निवडणुका जिंकत गेलो. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा प्रवास मलाच आश्चर्यचकित करणारा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष नसतो तर कदाचित मुख्यमंत्रीही झालो नसतो, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. सीबीडी फाउंडेशनच्या आनंदयात्रा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घ्यावे आणि वकिली करण्याची इच्छा होती. पण वडिलांच्या निधनानंतर सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. या काळात आईने मला खूप पाठिंबा दिला. तिच्यामुळेच मला आज यशाचे शिखर गाठता आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषदेत काम केले पण राजकारणात येईन असे वाटले नव्हते. पण, वाट्याला आलेली जबाबदारी मनापासून पूर्ण केली. यातूनच शिकत गेलो. आपल्या कामाने चार लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले, तरच आपले जीवन सफल आहे, सुशीलकुमार शिंदे यांनी शिपाई, एक पोलीस उपनिरीक्षक ते केंद्रीय गृहमंत्री असा रंजक प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘सकाळी कोर्टात शिपायाचे काम आणि नंतर रात्रशाळेत शिक्षण असा दिनक्रम होता. कॉलेजमध्ये ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ अशा नाटकांत स्त्री-पात्रे रंगवली. त्या वेळी राजकारणात येईन असे वाटले नव्हते. आता लवकरच वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहे. प्रत्येकाने दु:खाला आनंदयात्रा म्हणून पाहिले तर त्याची झळ कधीच पोहोचणार नाही, त्यामुळे कठीण प्रसंगाला न डगमगता धैर्याने सामोरे जावे, असा सल्ला शिंदे यांनी उपस्थितांना दिला. (प्रतिनिधी)