मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रचार आणि प्रसार दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे; त्यास कारणही तसेच आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात जंगी सामना रंगला असतानाच आता शेट्टी यांच्या प्रचारार्थ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत.२४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता दहिसर पूर्वेकडील चिंतामणी नगर येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून, मुख्यमंत्र्यांची सभा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीदरम्यान भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून तब्बल चार लाख मतांनी आघाडीवर होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला होता. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत संजय निरुपम हे उत्तर मुंबईतून विजयी झाले होते. तेव्हा त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. तत्पूर्वी २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीदरम्यान उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते गोविंदा आणि भाजपचे राम नाईक यांच्या जंगी सामना रंगला होता. तेव्हा राम नाईक यांना पराभवास सामोरे जावे लागले होते.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाळ शेट्टी यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले असतानाच काँग्रेसला येथून उमेदवार मिळत नव्हता. संजय निरुपम यांचे नाव चर्चेत असतानाच त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळाली. आणि अखेर उत्तर मुंबईतून काँग्रेसतर्फे बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव घोषित झाले. उर्मिला अणि शेट्टी यांच्यातील सामना दिवसागणिक रंगत असून, मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी आणि नंतर येथील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.यांनी गाजवले मैदान...गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, भाजप दिल्ली प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, महाराष्ट्र भाजप प्रवक्ता शायना एन.सी यांनी शेट्टी यांच्या प्रचारासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे मैदान गाजवले आहे. उत्तर मुंबई मतदार संघात मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करतील़
ऊर्मिला मातोंडकरांना टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:04 AM