कारशेडच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला म्हणजे संवेदनाहीनतेचा पुरावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:50 PM2020-12-20T18:50:09+5:302020-12-20T18:50:27+5:30

Metro car shed : आमदार अतुल भातखळकर यांची टीका

The Chief Minister's advice in the case of a car shed is proof of insensitivity | कारशेडच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला म्हणजे संवेदनाहीनतेचा पुरावा 

कारशेडच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला म्हणजे संवेदनाहीनतेचा पुरावा 

Next


मुंबई: विरोधकांनी म्हणजे भाजपाने कांजूरमार्गच्या कारशेडच्या बाबतीत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला म्हणजे खोटारडेपणाचा आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा, संवेदनाहीनतेचा पुरावा असल्याची घणाघाती टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुळातच कांजूरमार्गच्या जागेवर अनेक दावे प्रलंबित आहेत. दिवाणी न्यायालयामध्ये यासंदर्भातले दावे खासगी विकासकांचे प्रलंबित आहेत, हे सगळं लपवून ठेवून घाईगडबडीत, गुपचूप आणि मुख्यतः  कायदा पूर्णतः धाब्यावर बसवून ही जमीन हस्तांतरित करण्याचा खटाटोप  मुख्यमंत्र्यांनी पुत्रप्रेमापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी केला. तो उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगलट आल्यामुळेच मुख्यमंत्री असा शहाजोगपणाचा आणि खोटा पवित्रा घेत असल्याचे
भातखळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मेट्रो कारशेडच्या  निमित्ताने अनेक दावे केले. हे दावे पूर्णतः अशास्त्रीय असून वस्तुस्थितीला सोडून आहेत. मुळातच सत्तेवर आल्या आल्या आरे मधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, त्याचवेळेला कांजूरमार्गमध्ये किंवा अन्य कुठे पर्यायी जागा मिळते का याची चाचपणी करायला सुरुवात केली. पण त्यांनीच नेमलेल्या सौनक समितीने आरेमध्येच कारशेड करणे कसे योग्य आहे हे विस्तृतपणे सांगितल्यानंतर सुद्धा हा समितीचा अहवाल कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी फेटाळला हे त्यांनी जनतेला आज किंवा किंवा किमान विधानसभेत सांगण्याची आवश्यकता होती. पण कुठलेही योग्य उत्तर नसल्यामुळेच आणि केवळ अहंकारातून हा निर्णय घेतल्यामुळे अहवाल तर जनतेपासून लपवून ठेवला, पण त्याचबरोबर आज सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात 'खोट बोल पण रेटून बोल' अशा पद्धतीने दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहेत.

आरेच्या कारशेड हा स्थिरता नसलेला प्रकल्प आहे हे त्यांचे म्हणणे म्हणजे या विषयात ते किती अज्ञानी आहेत हेच यातून स्पष्ट होते. या सर्व गोष्टींचा उल्लेख सौनक समितीने आपल्या रिपोर्ट मध्ये केलेला असताना सुद्धा मुख्यमंत्री इतकं अत्यंत चुकीचं आणि धडधडीत खोटे बोलत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
 
स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवण्याकरिता आणि आमदारकी करिता जर का ते देशाच्या प्रधानमंत्र्यांना फोन करू शकतात तर मग कांजूरमार्गच्या जागेकरिता फोन करताना त्यांना लकवा मारला होता का? असा प्रश्न पडतो. तसेच जनतेच्या हिताच्या कामाच्या वेळेला मात्र अहंकार येतो आणि स्वतःची खुर्ची टिकवण्याकरता मात्र लोटांगण घालायला तयार असतात हाच यातून अर्थ निघतो.  भारतीय जनता पार्टीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दिवशीच हे सांगितलेल आहे की, आजही आपण आरे मध्ये कारशेडचं काम चालू करा,यामध्ये भाजपाचा विजय झाला किंवा तुमचा पराभव झाला असे आम्ही म्हणणार नाही, हे आम्ही प्रतिज्ञापत्रावरही लिहून द्यायला तयार आहोत हेच आम्ही त्यादिवशी पण सांगितले. मुंबईकर जिंकले पाहिजेत आणि मुंबईकरांना लवकरात लवकर ट्रॅफिक जाम मधून वाचवण्याकरता मेट्रो मिळाली पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका होती, आहे आणि यापुढे सुद्धा राहील असेही आमदार भातखळकर यांनी संगितले.

कांजूरमार्गच्या जागेच्या बाबतीत खोटं बोलून आणि खोटे दावे करून हा प्रश्न सुटणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. न्यायालयाच्या थपडा खाल्ल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीने बोलत राहिले तर प्रश्न सुटणार नाही. जनतेच्या हिताकरिता अहंकार आणि पुत्रप्रेम बाजूला ठेवावं आणि मुंबईकरांना मेट्रो लवकरात लवकर द्यावी अशी विनंती शेवटी भातखळकर यांनी केली आहे.
 

Web Title: The Chief Minister's advice in the case of a car shed is proof of insensitivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.