मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गत दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.
या शिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
सदर देणग्यांना आयकर अधिनियमाच्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते. अधिकाधिक लोकांनी या कामी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९
बँकेचे बचत खाते क्रमांक- ३९२३९५९१७२०
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३
शाखा कोड ००३००
आयएफएससी कोड SBIN0000300