गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांची सलमान खानसोबत फोनवरून चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:56 AM2024-04-15T07:56:51+5:302024-04-15T07:57:41+5:30
सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सलमान खानची विचारपूस केली. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सलमान खान गोळीबार प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली आहे. आज पहाटे सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. तसेच मी त्याला सुरक्षेसंदर्भात देखील दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
तपास सुरू आहे : फडणवीस
सलमान खान प्रकरणात पोलिस सध्या तपास करत आहेत. त्याची माहितीदेखील मिळेल आणि ती जेव्हा मिळेल तेव्हा ती दिली जाईल. त्यामुळे अटकळबाज्या करण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज ठाकरे सलमानच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सलमान खानची त्याच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली. सलमान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथे राज ठाकरे पोहोचले आणि हल्ल्यासंदर्भात सलमानची विचारपूस केली. त्याचबरोबर शिंदे गटाचे माजी नगरसेवक राहुल कनाल यांनी सलमानची भेट घेतली. अशा गोष्टीने सलमानला फरक पडत नाही. देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे, असे कनाल म्हणाले.