मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी सलग तीन दिवस पूर्व उपनगर,शहर आणि पश्चिम उपनगराच्या नाल्यांची पाहाणी केली होती.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघासह त्यांनी मिठी नदीची सफाई आणि अन्य नाल्यांची पाहणी केली.तर सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहाणी मुख्यमंत्री करणार आहेत. येत्या ऑक्टोबर मध्ये पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुण्यात दिले होते. तर काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी अगला मुंबईका मेयर भाजपा का ही होगा असा ठाम दावा कांदिवली येथील भाजप पदाधिकाऱ्यां च्या सभेत केला होता. आता चक्क मुख्यमंत्र्यांनी आपले लक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूकीवर केंद्रीत केल्याने शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे.
उद्या शुक्रवार दि,19 मे रोजी दुपारी 3 वाजता मिलन सब वे,3.30 वाजता विजय नगर,सहार रोड,गोखले पूल,4 वाजता ओशिवरा नदी,4.30 वाजता पोईसर नदी,5 वाजता दहिसर नदी,आनंद नगर पूल दहिसर पूर्व पश्चिम,बोरिवली पूर्व येथील दहिसर नदीच्या पुनरितजीवन कामाची पाहणी, नॅशनल पार्क पश्चिम दूर्तगती महा मार्गा वरील श्रीकृष्ण नदी पूल,5.30 वाजता दहिसर पूर्व येथील मीनाक्षी नाला आदी विविध नाल्यांची मुख्यमंत्री पाहाणी करणार आहेत. तर 5.45 वाजता बोरिवली पश्चिम,शिंपोली येथील अटल स्मृती दालनात पीपीटी प्रेझेंटेशन आणि पत्रकार परिषदअसा मुख्यमंत्र्यांचा पश्चिम उपनगरात भरगच्च कार्यक्रम असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी लोकमतला माहिती दिली. यावेळी युतीचे खासदार,आमदार,माजी नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.