‘कोरोना’बाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:01 AM2020-01-26T05:01:58+5:302020-01-26T05:05:02+5:30
यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : कोरोना जंतुसंसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
रुग्ण तपासणी व उपचाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना व्हायरस आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी राज्य शासनाच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. ज्या तीन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, त्यातील दोघांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कालच दिला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सध्या वातावरणातील बदलांमुळे सामान्य स्वरूपाच्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. अशाच स्वरूपाची लक्षणे कोरोना जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांतही आढळून येतात. त्यामुळे रुग्णांमध्ये फरक ओळखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी बैठकीला उपस्थित होते.
‘त्यानंंतरच डिस्चार्ज’
रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यांना डिस्चार्ज कधी द्यायचा याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.