‘मनोरा’ पुनर्बांधणीची परवानगी सात दिवसांत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:56 AM2019-05-29T05:56:26+5:302019-05-29T05:57:16+5:30
मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीसाठीच्या आवश्यक परवानग्या एमएमआरडीएने सात दिवसांच्या आत द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.
मुंबई : मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीसाठीच्या आवश्यक परवानग्या एमएमआरडीएने सात दिवसांच्या आत द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.
या पुनर्बांधणीसंदर्भातील उच्चाधिकार समितीची बैठक विधान भवनात होऊन आढावा घेण्यात आला. या वेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या पुनर्बांधणीसाठी एमएमआरडीएने अनेक प्रकारच्या कागदपत्रांची विचारणा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करीत आवश्यक त्या परवानगी दिलेल्या नाहीत. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी या पुनर्बांधणीचा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार बांधकाम करायचे तर ५.४ एफएसआय मिळायला हवा, असे बांधकाम खात्याचे म्हणणे आहे. सीआरझेडच्या नियमांनुसार १.३३ इतकाच एफएसआय देता येईल, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. यावर तोडगा म्हणून तूर्त १.३३ एफएसआयच्या मर्यादेत एमएमआरडीएने परवानगी द्यावी आणि सीआरझेड नियम शिथिल केल्यानंतर अतिरिक्त एफएसआयची परवानगी द्यावी, असा तोडगा काढण्यात आला आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन १७ जूनपासून सुरू होणार असून अधिवेशन संपताच जुलैमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मनोरा पुनर्बांधणीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.