मुंबई - मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी जवळपास 53 फुटांनी वाढलेल्या अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील पुराची गंभीर स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती.
मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुराचा आढावा घेतला. बैठकीअगोदर पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला. या भागात एनडीआरएफच्या 22 टीम दाखल झाल्या आहेत. तसेच 80 भारतीय जवानदेखील दाखल झालेत. करवीर, शिरोळमधील 8 गावं पुरात बुडाली आहेत. सांगलीतील राजाराम बंधाऱ्यातून पाणी वाहू लागल्या लागल्याने 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. सांगली 307 टक्के पाऊस झाला आहे. महिला, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देत आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस येथील 4 हजार जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सातारा, सांगली, कोल्हापुरात आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात 64 गावं पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली आहेत. पालघर, वाडा, वसई याठिकाणी पाणी शिरल्याने नुकसान झालं होतं. तेथेही आता परिस्थिती नियंत्रणात आहे. महाडला जी पूर परिस्थिती निर्माण झाली तेथून लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. रत्नागिरी, रायगड याठिकाणीही पुराच्या पाण्यातून अनेक जणांना वाचविण्यात आलं आहे. मिरज आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच गुजरात, ओडिशा येथे असणाऱ्या एनडीआरएफ टीम महाराष्ट्रात मागविण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आर्मी, एअरफोर्स, नेव्हीची पथकंही मदतीसाठी मागविण्यात येत आहेत असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान पुरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी मी जाईन पण सध्या तेथे बचावकार्य होणं गरजेचे आहे. बचावकार्यात अडथळा नको आणि प्रशासनाचा खोळंबा होऊ नये यासाठी मी तेथे जाणं टाळतोय. पालकमंत्री त्या त्या भागाला भेट देतील. बचावकार्याबाबत मी वेळोवेळी त्यावर नजर ठेऊन आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तात्काळ देण्यात येणारी रक्कम 10 हजार ते 15 हजार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचसोबत शेतीचे पंचनामे करुन तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी पूर ओसरला तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा तातडीने देण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. साथ रोगाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने उपाययोजना अधिक वाढवाव्यात आवश्यकता भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथक देखील पाठविण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पूर ओसरल्यानंतर त्या भागात वीज पुरवठा तातडीने पुर्ववत होणे गरजेचे आहे त्यासाठी अतिरीक्त पथके तैनात करण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले.
पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिकची पथके पाठविण्यात येतील. औषधांचे साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.