पनवेल: खारघर शहरात येत्या १६ तारखेला महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचा सोहळा पार पडणार आहे. हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असुन लाखोंच्या संख्येने श्री सदस्य खारघर शहरात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.10 रोजी खारघर शहरात कार्यक्रमाबाबत आढावा बैठक घेतली.
याबाबत पालिका प्रशासन,पोलीस प्रशासनासोबत मुख्यमंत्र्यानी महत्वाची चर्चा करीत,कार्यक्रमाचे आयोजन उत्तम पद्धतीने पार पाडण्याबाबत सुचना केल्या.कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमन्याची सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
या कार्यक्रमाला अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे याव्यतिरिक्त स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे अशीही महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे या कार्यक्रमाला लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे.या बैठकीला रायगडाचे पालकमंत्री उदय सामंत,शंभूराज देसाई यांच्यासह स्थानिक आमदार,प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.