मुंबईत लवकरच जलप्रवास, मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:54 AM2019-03-04T05:54:11+5:302019-03-04T05:54:26+5:30
मुंबईत लवकरच जल प्रवास सुरु करण्यात येणार आहे मात्र सध्या न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रवास अडकला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : मुंबईत लवकरच जल प्रवास सुरु करण्यात येणार आहे मात्र सध्या न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रवास अडकला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बहुप्रतिक्षीत मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केल्यानंतर मोनोरेलने संत गाडगे महाराज चौक ते वडाळा स्थानकादरम्यान दिमाखदार प्रवास केला. या प्रवासात सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये उत्साहाचे भरते आले होते. उद्घाटन समारंभाला केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार आशिष शेलार, राहुल नार्वेकर, वारिस पठाण, सुनील शिंदे, तामिल सेल्वन, प्रसाद लाड यांच्यासह एमएमआरडीएचे संजय खंदारे, सोनिया सेठी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यातील मोनोची स्थानके
संत गाडगे महाराज चौक ते वडाळा डेपो या दरम्यान लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल, जी.टी.बी.नगर या स्थानकांचा समावेश आहे. तिकीट दर सध्या ५ रुपये किमान व ११ रुपये कमाल होते आता ते १० रुपये किमान व ४० रुपये कमाल होणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध राहील.