मुंबईतील दरडी कोसळणाऱ्या भागातील लोकांचे भय संपणार, घाटकोपर येथील दरडप्रवण क्षेत्राला मुख्यमंत्र्यांची भेट
By जयंत होवाळ | Published: June 26, 2024 07:24 PM2024-06-26T19:24:48+5:302024-06-26T19:25:11+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. मुंबईत पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईतील दरड कोसळणारे भाग संरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. आझाद नगर, घाटकोपर येथील संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जीओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली. मुंबईत पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील संभाव्य ३१ ठिकाणी दरड कोसळणाऱ्या क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर यानिमित्ताने सुरू झाला आहे. दरड कोसळणाऱ्या क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, हे आमचे प्राधान्य आहे. दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले.
शिंदे यांनी मुंबईत दरड कोसळणाऱ्या क्षेत्रात ३१ ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी जिओ नेटिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्याच पद्धतीने घाटकोपर येथे हनुमान टेकडी (आझाद नगर) परिसरात काम सुरू आहे. स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यातही ही कामे सुरू राहणार आहेत. 0 अशा रोखल्या जातील दरडी स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करत बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. एकूण २५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बोल्टिंगचा वापर करत दगड रोखून धरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकूण १६ जणांचा प्रशिक्षित चमू दोन पाळ्यांमध्ये हे काम करत आहे. माती तसेच काळा पाषाण (ब्लॕक बसाल्ट) या क्षेत्रात आहे. बोल्टिंगचा उपयोग हा पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो. ड्रिल करून सुमारे ८ मीटर इतके आत दगडात वापरण्यात येतात. प्रत्येक २ मीटर अंतरावर हे ड्रिलिंगचे काम करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 0 धोकादायक इमारतींसाठी धोरण दरड कोसळणाऱ्या क्षेत्रातील घरांबरोबरच म्हाडा, महापालिका, एमआयडीसी यासह इतर सरकारीयंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.