गोखले पुलाच्या कामावरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:25 AM2023-12-10T09:25:06+5:302023-12-10T09:25:14+5:30
वेळेत काम करा, नाही तर दणका.
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल बांधकामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घेतला. दरम्यान, नियोजनाप्रमाणे काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असा इशारा देताना त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वासन दिले.
या उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित केल्यानंतर, पहिली मार्गिका वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने निश्चित केलेल्या कालावधीत कामे पूर्ण करावीत तसेच रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या रेल्वे वाहतूक ब्लॉकचा योग्य वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
या उड्डाणपूल प्रकल्पातील रेल्वे भूभागात पहिल्या टप्प्यातील गर्डर दोन्ही पिलर्सच्या वर योग्य जागी स्थापन करण्यात आला. दरम्यान, आता येत्या आठवड्यात हा गर्डर १४ मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो ७.५ मीटर खाली आणणे ही कामे नियोजित करण्यात आली आहेत.
पुलाची लांबी -
रेल्वे भूभागात - ९० मीटर
रेल्वेबाहेर - पूर्वेला २१० मीटर, पश्चिमेला - १८५ मीटर
पुलाची रुंदी -
(रेल्वे भूभागात) - १३.५ मीटर
रेल्वेच्या पूर्वेला व पश्चिमेला पोहोच रस्ते, पदपथासह - १२ मीटर (दोन्ही बाजूस)
एकूण रुंदी - २४ मीटर
तब्बल ८० टक्के कामदेखील पूर्ण :
एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळ्या अंथरून सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिक करण्यात येईल.
पालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचेदेखील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
नियोजनाप्रमाणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुलाच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होऊन अंशतः खुला करण्याचे नियोजन आहे.