सुजाता सौनिकांनी राजीनामा का द्यायचा? आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजपला लाडक्या ठेकेदारांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:10 PM2024-08-29T15:10:45+5:302024-08-29T16:53:48+5:30

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Chief Secretary Sujata Saunik offer of resignation Aaditya Thackeray question | सुजाता सौनिकांनी राजीनामा का द्यायचा? आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजपला लाडक्या ठेकेदारांना..."

सुजाता सौनिकांनी राजीनामा का द्यायचा? आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजपला लाडक्या ठेकेदारांना..."

Aaditya Thackeray on  Sujata Saunik : महिन्याभरापूर्वीच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी मुख्य सचिवपदी बसण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला होता. राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीवरुन  राजकारण सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कार्यकाळ संपण्याआधीच राज्य सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्राला लुटण्यासाठी भाजपला राज्यात आवडत्या व्यक्तीला नियुक्त करायचे आहे. त्यामुळेच सौनिक यांचा राजीनामा घेतला जातोय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर १९८७च्या तुकडीतील ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक या हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कार्यकाळानुसार सुजाता सौनिक ज्यांची निवृत्ती जून २०२५ मध्ये होणार आहे. मात्र त्याआधीच त्यांना पद सोडण्यास सांगून त्याजागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा डाव भाजपने आखल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एक्स पोस्टवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.  "भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्त्रियांना “कमी शक्तिशाली, कमी सक्षम” मानणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याविषयी बोलतात. मात्र अहवाल सांगतो की, महाराष्ट्रातील भाजप-मिंधे सरकार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देण्यास भाग पाडत आहे. जेणेकरुन भाजपला महाराष्ट्र लुटण्यास मदत करणाऱ्या आवडत्या एकाला त्या पदावर नियुक्त करता येईल. सुजाता सौनिक यांनी कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा का द्यायचा? बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि भाजपला लाडक्या ठेकेदारांना ठेका देणारा माणूस हवा म्हणून?," असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, १ जुलै रोजी आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळलेला होता. सुजाता सौनिक या जून २०२५ पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत. सुजाता सौनिक यांच्याऐवजी महसूल विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमारी आणि माजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Chief Secretary Sujata Saunik offer of resignation Aaditya Thackeray question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.