दोन तासांत आरोपी गजाआड : मालाड पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका कर्मचारी असल्याचा बनाव करून मास्क न घातलेल्या १३ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले हाेते. मात्र मालाड पोलिसांनी अवघ्या दोन तासात अत्यंत शिताफीने तपास करत अपहृत मुलाची सुटका करून आरोपीला गजाआड केले.
शेखर विश्वकर्मा (वय ३५) आणि दिव्यांशू विश्वकर्मा (२१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते मालाड लिंकरोडजवळील वलनाई परिसरातील रहिवासी आहेत. अपहृत मुलाच्या वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. तो रविवारी घराबाहेर क्रिकेट खेळत असताना हे दोघे त्याच्याजवळ गेले आणि पालिका कर्मचारी असल्याचे सांगून मुलाकडे मास्कबाबत विचारणा केली. त्यानंतर त्याला जबरदस्ती रिक्षात टाकून घेऊन गेले. मुलाच्या मित्राने अपहृत मुलाच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेखनेही त्यांना फोन केला. तुमच्या मुलाचे अपहरण केले असून, १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
त्यांनी मालाड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर दळवी यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांनी रिक्षाचा क्रमांक मिळवून अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. खंडणीसाठी अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना फोन करत सतत जागा बदलत होते. मात्र मोबाईल टॉवर लोकेशनवरून अखेर पाेलिसांनी याप्रकरणी कांदिवली पश्चिमेतून दाेघांना अटक केली. मुलाचीही सुखरूप सुटका करण्यात आली.
....................