अत्याचाराचा बळी ठरलेल्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:02 AM2017-07-26T06:02:38+5:302017-07-26T06:02:40+5:30

शेवटचे पाणीदेखील माझ्या मुलाला पाजू शकलो नाही, मला वाटलेले तो जगेल,’ असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता पवईतील तेरा वर्षीय मुलाच्या वडिलांचा. आरेमध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर लाजेपायी त्याने विषप्राशन केले

child dead, Sexual Abuse | अत्याचाराचा बळी ठरलेल्या मुलाचा मृत्यू

अत्याचाराचा बळी ठरलेल्या मुलाचा मृत्यू

Next

मुंबई : ‘शेवटचे पाणीदेखील माझ्या मुलाला पाजू शकलो नाही, मला वाटलेले तो जगेल,’ असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता पवईतील तेरा वर्षीय मुलाच्या वडिलांचा. आरेमध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर लाजेपायी त्याने विषप्राशन केले. गेले पंधरा दिवस मृत्यूशी झुंजही दिली. अखेर मंगळवारी परळच्या केईएम रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. मात्र, त्याला मरेपर्यंत वेदना देणाºया नराधमाला शोधण्यात पवई पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केईएमच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी १३ वर्षीय सुनीलच्या (नावात बदल) वडिलांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली. ‘माझा मुलगा कोमामध्ये गेला, पण त्यापूर्वी त्याने प्रचंड वेदना सहन केल्या, तो ओरडत राहिला, पण त्याला केवळ पाहण्याशिवाय मी काहीही करू
शकत नव्हतो. तो वारंवार पाणी मागत होता. त्यानंतर कोमात गेला... त्याला मला शेवटचे पाणीही पाजता आले नाही,’ असे सांगत, वडिलांनी हंबरडा फोडला. तर आपला हसता-खेळता मुलगा कायमचा शांत झालाय, यावर आईचा विश्वासच बसत नव्हता.

सुनीलच्या मृत्यूची बातमी तो राहात असलेल्या पवई परिसरात पसरली आणि स्थानिकांनी त्याच्या घराजवळ जमायला सुरुवात केली. पवई पोलिसांनी लगेचच या ठिकाणी बंदोबस्त वाढविला. त्याचा मृतदेह त्याच्या घरी नेण्याआधी, तो पवई पोलिसांच्या बीट चौकीसमोर ठेवण्यात आला.
आरोपी सापडत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका सुनीलचे नातेवाईक आणि शेजाºयांनी घेतली. अखेर पवई पोलिसांनी हस्तक्षेप करत, ‘आम्ही लवकरात लवकर आरोपीला पकडू आणि त्याला कडक शिक्षा मिळेल, यासाठी प्रयत्न करू,’ असे स्थानिकांना सांगत, त्यांची समजूत काढली. त्यानंतर, साडेचारच्या सुमारास अंत्ययात्रा सुरू झाली.
अंधेरीतील मरोळच्या सातबाग स्मशानभूमीत सुनीलला अखेरचा निरोप देण्यात आला. कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या अंत्ययात्रेत जवळपास दोनशे ते अडीचशे लोक सहभागी झाले होते.

Web Title: child dead, Sexual Abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.