शॉकने मुलाचा मृत्यू; कंत्राटदाराला लाखोंचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:57 AM2023-12-01T10:57:13+5:302023-12-01T10:57:42+5:30
चेंबूरची दुर्घटना; दोघांच्या विरोधात गुन्हा.
मुंबई : वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो ४ च्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या पत्र्याला स्पर्श झाल्याने १४ वर्षीय बालकाच्या मृत्यू प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी दोघासुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापुढे अशी दुर्घटना घडू नये म्हणून बांधकाम ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून याप्रकरणी एमएमआरडीएने कंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक एलएलपीला ५ लाखांचा आणि प्रकल्प सल्लागाराला १ लाखांचा दंड ठोठावला आहे. मंडाळे ते डी एन नगर या मेट्रो २ ब च्या कामानिमित्त उभारण्यात आलेल्या पत्र्याला स्पर्श झाल्याने १४ वर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणीपोलिसांनी दोघा सुपरवायझर विरोधात नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमएमआरडीएने नेमलेल्या कंत्राटदाराचे हे सुपरवायझर असून यापुढे अशी दुर्घटना घडू नये म्हणून बांधकाम ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. मानखुर्द ते अंधेरी या मेट्रो २ ब मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सिद्धार्थ कॉलनी परिसरात राहणारा प्रज्वल नखाते (१४) हा दुपारी मित्रांसमवेत खेळायला गेला त्यावेळी लोखंडी पत्र्याला त्याचा स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार शॉक बसला.
एलईडी लाइटचा वीजप्रवाह पत्र्यात:
मेट्रोच्या कामादरम्यान एलईडी लाइटचा वीजप्रवाह तुटून लोखंडी पत्र्यात वीज प्रवाह सुरू झाला त्यामुळे शॉक लागल्याचे तपासात निष्पन्न झाले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोलिसांनी कंत्राटदाराने नेमलेल्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापुढे अशी दुर्घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल तशा सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिली.