बालकांची होतेय पिळवणूक
By admin | Published: February 19, 2016 02:39 AM2016-02-19T02:39:39+5:302016-02-19T02:39:39+5:30
मुंबईसह नवी मुंबईत उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा गैरफायदा घेत परराज्यातील महिलांसह मुलांवर अत्याचार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
मुंबईसह नवी मुंबईत उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा गैरफायदा घेत परराज्यातील महिलांसह मुलांवर अत्याचार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नोकरीच्या बहाण्याने महिला व लहान मुला-मुलींना आणले जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचारासारख्या गांभीर्याच्या घटना घडत आहेत. अशा टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनाही कंबर कसावी लागणार असल्याची गरज पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केली आहे.
परराज्यातील महिलांवर लैंगिक अत्याचारासह अल्पवयीन मुलांना नोकरीसाठी जुंपले जात असल्याचे प्रकार नवी मुंबईत घडू लागले आहेत. जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून परराज्यातील लहान मुलांसह महिलांना महाराष्ट्रात मुंबईसह नवी मुंबईत आणणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. मात्र इथे आल्यानंतर सदर महिला व मुला-मुलींना लैंगिक शोषणासह इतर अत्याचाराला बळी पाडले जात आहे. नुकतेच आसाम येथून नोकरीच्या शोधात पनवेलमध्ये आलेल्या महिलेला मुंबईत ग्रँट रोड येथे वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी कारवाई करुन त्या पीडित महिलेसह तिच्या मुलांची सुटका केल्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलीवर देखील लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या महिलेला चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून आसाम येथून पनवेलमध्ये बोलवण्यात आले होते. तिथे येताच तिच्यावर बलात्कार करुन ४० हजार रुपयांना विकण्यात आले होते. गत महिन्यात कोपरखैरणे पोलीस व गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हॉटेल व कॅटरर्सवर छापे टाकून १५ हून अधिक अल्पवयीन मुलांची सुटका केलेली आहे. ही सर्व मुले उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यातून नोकरीसाठी आणलेली होती. सदर टोळीने या मुलांना ज्या हॉटेलमध्ये पोचवले होते त्याठिकाणी या मुलांना रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त कोणताही मोबदला न देता मेहनतीचे काम करुन घेतले जायचे. त्याचा आर्थिक मोबदला दलालांच्या खिशात पोचत होता. या टोळीने मुलांना खोट्या वयाची बनावट आधार कार्ड देखील दिलेली होती. असेच प्रकार औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये देखील घडत असल्याची दाट शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणांसह, विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी असल्याची माहिती परराज्यात पसरलेली आहे.
याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने परराज्यातील अल्पवयीन मुला-मुलींसह महिलांना मुंबईसह नवी मुंबईत आणले जात आहे. त्यानंतर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या टोळ्या त्या मुलांना भीक मागायला भाग पाडतात.