बालकाला मिळाले जीवनदान
By admin | Published: November 17, 2016 06:23 AM2016-11-17T06:23:40+5:302016-11-17T06:23:40+5:30
बालदिनाच्या दुसऱ्या दिवशी एका १० वर्षांच्या बालकाला जीवनदानाची भेट मिळाली आहे. बेलापूर येथे ब्रेनडेड घोषित करण्यात आलेल्या मुलाचे
मुंबई : बालदिनाच्या दुसऱ्या दिवशी एका १० वर्षांच्या बालकाला जीवनदानाची भेट मिळाली आहे. बेलापूर येथे ब्रेनडेड घोषित करण्यात आलेल्या मुलाचे हृदयदान करण्यात आले. मुंबईत मंगळवारी पहाटे झालेली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही ३६ वी शस्त्रक्रिया आहे.
बेलापूर येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा अपघात झाला. या अपघातात त्याला जबर मार बसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच्या मेंदूला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे निदान झाले. उपचारांना हा तरुण प्रतिसाद देत नव्हता. उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. या तरुणाच्या मोठ्या भावाचाही काही अशा प्रकारे जीवघेणा अपघात झाला होता. त्यात त्याचे निधन
झाले होते. लहान मुलाचाही अपघात झाल्याने पालकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता,
पण तरीही मुलगा गेल्याच्या दु:खाला आवर घालत, अन्य व्यक्तींना जीवनदान मिळावे, म्हणून
त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलाचे यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि डोळे दान करण्यात आले.
१० वर्षांच्या एका मुलाचे हृदय निकामी झाले होते. त्याच्यावर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. या मुलाला २१ वर्षांच्या मुलाचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. आता या मुलाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)