मुंबई: सुरतच्या एका रुग्णालयात १९ वर्षीय मुलाचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याच्या पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या १९ वर्षीय मुलाच्या हृदयदानामुळे मुंबईच्या १५ वर्षीय मुलाला जीवनदान मिळाले आहे. सुरत ते मुंबई दरम्यानचे ३१२ किमीचे अंतर अवघ्या १ तास ५० मिनिटांत कापून हृदय आणून सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली. हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून मुलाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. सहाव्या लहान मुलावर हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुरतच्या आयुष आयसीयू अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ वर्षीय मुलाला डोक्याला मार लागल्यामुळे दाखल केले होते. त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर त्याच्या पालकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. हृदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. १५ वर्षीय मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून प्रतिक्षा यादीत होता. गेल्या एका वर्षापासून रिस्ट्रिक्टेड कार्डिओमायोपॅथी आजाराने ग्रस्त होता. त्याला हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. पण, त्याला हृदय मिळत नव्हते. शनिवारी रात्री हृदय मिळू शकते अशी कल्पना आल्यावर रुग्णालयाने तयारी सुरू केली होती. सुरतच्या रुग्णालयातून सकाळी ८.५०ला हृदय घेऊन डॉक्टर निघाले. सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी हृदय फोर्टिसमध्ये पोहचले. लहान मुलांचे हृदयशल्यचिकित्सक डॉ. विजय अग्रवाल यांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. (प्रतिनिधी)
लहान मुलाला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 3:40 AM