सत्तर वर्षांच्या आईने दिले मुलाला मूत्रपिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:51 AM2018-06-28T06:51:57+5:302018-06-28T06:52:57+5:30
आईचे आपल्या मुलावरील प्रेम निर्विवाद असते आणि जेव्हा आपल्या मुलाचा जीव वाचविण्याची वेळ येते, तेव्हा ती कोणतीही जोखीम पत्करायला तयार असते.
मुंबई : आईचे आपल्या मुलावरील प्रेम निर्विवाद असते आणि जेव्हा आपल्या मुलाचा जीव वाचविण्याची वेळ येते, तेव्हा ती कोणतीही जोखीम पत्करायला तयार असते. अलीकडेच, उत्तर प्रदेशातील ४५ वर्षीय जुनैद (नाव बदललेले) या पॉलीसीस्टिक किडनी विकाराने त्रस्त मुलाला त्याच्या ७० वर्षीय आईने (फातिमा-नाव बदललेले) आहे, जीवनदान दिले.
विलेपार्ले येथील खासगी रुग्णालयात हे अवयवदान पार पडले आहे. जुनैद पॉलीसीस्टिक मूत्रपिंड विकारावर उपचार मिळविण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातून मुंबईत आला. त्याच्या मूत्रपिंडाचा आकार वाढून २४ सेंमी झाला होता. सामान्यत: हा आकार ९-१० सेंमी असतो. यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून दोन्ही मूत्रपिंडे काढावी लागली.
रुग्णाला हेमोडायलिसिसवर ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी त्याला ६ वेगवेगळी औषधे घ्यावी लागत होती. मुलाची स्थिती पाहून फातिमाने आपले मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. तिचे वय पाहता, ती किडनी दान करण्यास पात्र आहे की नाही, हे तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या. सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असल्याचे आढळल्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. रुग्ण आणि त्याच्या आईची तब्येत आता बरी आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे आणि त्यांचे आरोग्य लवकर ठीक होणे, हेच आता आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. हरीश पाठक यांनी सांगितले.