मुंबई, पालघरमधील बालकामगारांची होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:21 AM2018-06-17T01:21:03+5:302018-06-17T01:21:03+5:30

मुंबई शहर व पालघर कार्यालयामार्फत १२ ते १८ जून या कालावधीत ‘जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

 Child labor in Mumbai, Palghar will be rescued | मुंबई, पालघरमधील बालकामगारांची होणार सुटका

मुंबई, पालघरमधील बालकामगारांची होणार सुटका

Next

मुंबई : मुंबई शहर व पालघर कार्यालयामार्फत १२ ते १८ जून या कालावधीत ‘जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने मुंबईसह पालघर जिल्ह्यात छापे टाकले जाणार असल्याची माहिती कामगार आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
राज्याचे कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कामगार उपआयुक्त शिरीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरासह पालघर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहानिमित्ताने मुंबईचे कामगार उपआयुक्त कार्यालयातील अधिकारी, नागपाडा पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तरीत्या नागपाडा परिसरात बालकामगार विरोधी जनजागृती मोहीम राबवली. दरम्यान, परिसरातील लोकांना बालकामगार प्रथेविरोधातील कामगार कायद्यांची माहिती देण्यात आली. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबई व पालघर जिल्ह्याचे कामगार उपआयुक्त बालकामगारांचा शोध घेण्यासाठी छापे टाकणार असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बोईसर, नवापऊर व सरावली परिसरात पालघर कार्यालयातील अधिकारी, बोईसर पोलीस विभागातील अधिकारी व विधायक संसद या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींच्या मदतीने हॉटेल, दुकाने, चहा टपरी, पान टपरी व इतर आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या वेळी काही मुलांची मुक्तता करून मालकांविरुद्ध बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी १२ जून रोजी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याच दिवशी कामगार उपआयुक्त पालघर कार्यालय व येथील अभिनव स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर रेल्वे स्टेशनपासून सकाळी १० वाजता जनजागृती रॅली काढण्यात आली. पालघरमधील ऊसगाव डोंगरी येथे कामगार उपआयुक्त यांच्यामार्फत विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयात गुरुवारी बालकामगार प्रथेविरोधी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे २७८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

Web Title:  Child labor in Mumbai, Palghar will be rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.